托马斯·库克(Thomas Cook)-178年的旅程终于结束了

आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळे सुट्टी मिळायची वाट पाहत असतो. सुट्टीचं प्लॅनिंग आपण ३-४ दिवस आधीच करतो. त्यात कधी लॉँग वीकएंड आला कि मग बोलायलाच नको. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बाहेर फिरायला आवडतं. त्यात अत्ताच्या तरुण पिढीला परदेश वारी करायला सुद्धा आवडते.

कोण आहे थॉमस कुक?

हे वरचे मुद्धे लक्षात घेता २००७ साली सुरु झालेली थॉमस कूक ही टूर ऑपरेटर कंपनी (भारतातली थॉमस कुक आणि हीचा काही समंध नाही). तशी हिची स्थापना १७८ वर्षांपूर्वी म्हणजेच  १८४१ साली थॉमस कूक यांनी हर्बोरो येथे केली. १७८ वर्षां नंतर ही जगातली  एक विशाल आणि बलाढ्य ट्रॅव्हल ग्रुप म्हणून ओळखली जाऊ लागली. तिची वर्षीक उलाढाल म्हणजेच अँन्यूअल टर्नओव्हर हा ९ अब्ज पाऊंड ( £9bn) एवढा असून एक कोटी नव्वद लाख ईतका ग्राहकसमूह होता. हा एवढा मोठा कारभार सांभाळायला २२,००० तत्पर कर्मचारी १६ देशांमध्ये कार्यरत होते. थॉमस कुक या कंपनीचा इतिहास वेगळाच होता, १९४८ मध्ये जेव्हा ती ब्रिटिश रेल्वेच्या मालकीची होती तेव्हा राष्ट्रीयकृत झाली आणि थॉमस कुक ने रॉकस क्लब १८-३० युथ ब्रँडचा मालकी हक्क मिळवला. अलीकडेच रॉकस क्लब १८-३० युथ ब्रँड हा खरेदीदार न मिळाल्याने बंद झाला.

का मंदावला व्यवसाय?

ज्याप्रमाणे प्रवासी जगाने प्रगती केली होती, त्याचप्रमाणे आधुनिक व्यवसाय आणि भ्रमंती विषयक व्यवसाय देखील बदलत होता आणि मागील दशकांपेक्षा खूप वेगाने पुढे जात होता. तो वेग कदाचित थॉमस कूकसाठी थोडा जास्त ठरला. त्यात आर्थिक, सामाजिक आणि हवामानशास्त्रीय अशा अनेक घटकांद्वारे थॉमस कूकचे भवितव्य धोक्यात आले. हवामानविषयक समस्या, ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट्स आणि कमी किमतीच्या विमान कंपन्यांकडून कडक स्पर्धा या बरोबरच इतर व्यत्यय आणणारे घटक सुद्धा होते ज्यामध्ये जगभरातील राजकीय अशांततेचा समावेश होता. याव्यतिरिक्त अनेक प्रवासी आपली सहल स्वतःच प्रायोजित करू लागले. त्यामुळे ट्रॅव्हल एजंट्सची मागणी कमी झाली.
व्यवसायाचे बरेचसे मूल्य हे कंपनीच्या ब्रँडमध्ये आणि ग्राहकांची निष्ठा यावर असल्याचे दिसून येते. कंपनीकडे मूर्त मालमत्ता (Tangible Assets) जसे की विमाने किंवा हॉटेल्स  हे फारच कमी होते. म्हणूनच, जेव्हा ग्राहक ऑनलाइन स्पर्धकांकडून किंवा त्यांच्या स्वतःची उड्डाणे आणि हॉटेल बुक करायला लागले, तेव्हा कंपनीचे मूल्य कमी झाले.

नेमकी का बंद पडली थॉमस कुक?

मे २०१९ मध्ये थॉमस कुकने आपल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत १.५ बिलियन पाऊंडचा तोटा दाखवला. थॉमस कुकच्या दुर्दैवी कर्मचारी, ग्राहक आणि भागधारकांसाठी इतिहासाची पुनरावृत्तीच झाली आहे कारण आठ वर्षांपूर्वी कंपनी दिवाळखोरीच्या काठाजवळ होती ज्यातून तिला काही बँकांनी  सांघिक ऋण देऊन बाहेर काढले. जेव्हा काही बँका एकत्र येऊन कर्ज देतात त्याला सांघिक ऋण (कन्सॉर्शीअम लेंडिंग) असे म्हणतात.
या सांघिक ऋणाचे नेतृत्व करत होती रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड आणि कर्मधर्मसंयोगाने ह्याच बँकेच्या अतिरिक्त पैसे मागण्या मुळे थॉमस कूक कोसळली. २०११ मध्ये कमकुवत व्यापार तसेच अतिरिक्त कर्जाचा डोंगर ह्या मोठ्या समस्या होत्या. हे कर्ज दोन बिलियन पाऊंडचे होते. २०१३ मध्ये ही समस्या मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कंपनीच्या शेअरहोल्डर्स कडून ४२५ मिलियन पाऊंड एवढे भांडवल उभे करण्यात आले. पण आज सहा वर्ष पुढे येऊन बघितल तरी परिस्थिती जैसे थे आहे असं म्हणण्याची वेळ येते. कंपनीवर आजच्या घटकेला १.६ बिलियन पाऊंड एवढा कर्जाचा डोंगर आहे. त्यातच परत एकदा खराब व्यापार, कमकुवत चलन (स्टर्लिंग) आणि युरोपमधील उष्णतेची लाट यामुळे कंपनीला व्यवसायात खुप मोठा फटका बसला आणि १७८ वर्षांचा प्रवास अखेरीस संपुष्टात आला. या मागे व्यवस्थापन नियंत्रणाचा अभाव हे सर्वात मोठं कारण मानलं जात असलं तरी अजून बरीच करणे आहेत.

काय आहे सद्यस्थिती ?

यूके सिव्हील एव्हिएशन अथॉरिटीने आजच्या घोषणेत सांगितलं कि विविध देशांमध्ये अडकलेल्या लोकांसाठी पुढचे दोन आठवडे प्रत्यावर्तन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. सहा ऑक्टोबर पर्यंत थॉमस कुकच्या ग्राहकांना परत यूकेमध्ये आणले जाईल.
ब्रिटीश नागरिकांच्या स्वदेशी परतण्यासाठी विमानाचा ताफा वापरला जाईल. काही ठिकाणांवर पर्यायी व्यावसायिक उड्डाणे वापरली जातील.  प्रामुख्याने ग्रीसमध्ये बेटांवर सुमारे ५०,००० पर्यटक अडकले आहेत. थॉमस कुकच्या सर्व ग्राहकांना विमानतळावर येऊ नये असे सांगितले गेले आहे कारण सर्व काही रद्द केले आहे. थॉमस कूक मुळे अडचणीत येण्याऱ्या हॉटेल्स आणि आणि इतर कंपन्यांशी  यूके सिव्हील एव्हिएशन ऑथॉरिटीने संपर्क साधून त्यांना त्यांचे पैसे देण्यात येतील याची हमी दिली आहे. जे ग्राहक पैसे भरून बसलेत त्यांना त्यांचे पैसे एअर ट्रॅव्हल ऑर्गनायझर लायसन्स योजने अंतर्गत परत करण्यात येतील.